Rang Jivnache

 रंग जीवनाचे ...

आपल्या दैनंदिन जीवनात रंगांचं खूप जास्त महत्त्व असतं. आपल्या कळत नकळत आपलं रंगांशी खूप जवळच नातं जोडलं जातं. कपडे, ज्वेलरी, गाड्या, घरं, घरांची सजावट, वाढदिवसांच्या थीम्स आणि बरेच काही! अगदी जेवणसुद्धा पहिले डोळ्यांनी जेवलं जातं असं म्हणतात. निसर्गात तर रंगांची अगदी उधळण झालेली असते. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये निसर्गात दडलेल्या अनेक रंगछटा आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या रंगांचं दर्शन आपल्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थिती आणि प्रसंगी माणसंही आपल्याला करून देत असतात.

जन्म आणि मृत्यू या दोघांमधला प्रवास म्हणजे "जीवन". जीवनात आपलं स्वागत अश्या दोन व्यक्तींकडून होतं ज्या त्यांच्या आयुष्यातल्या अनेक चढ-उतार, उन्हाळा-पावसाळ्यात शेवटपर्यंत एकमेकांना  साथ देतात. आपण अनोळखी माणसांसोबत सहज बोलतसुद्धा नाही पण आई-वडील नऊ महिने न पाहिलेल्या व्यक्तीवर प्रेम करतात आणि शेवटपर्यंत करत राहतात. त्यांचं प्रेम हे निळ्याशार अथांग समुद्रासारखेच असते….कधीही न संपणारे,नाही का? लहानपणी आई, आजीकडून काळ्या रंगाचे काजळ आणि तीट लावून वाईट शक्तीपासून आपलं रक्षण केलं जातं. गर्दीत चालताना आईच्या साडीच्या रंगावरून तिला शोधायच्या करामती तुम्हीही केल्या असतील. कदाचित त्या वयात सगळे रंग आपल्याला माहीतदेखील नसतात पण आपसूकच आपण रंगांची जादू हळूहळू ओळखायला शिकत असतो. बालपणात खेळणं बागडणं , मित्रांपेक्षा जास्त मार्क्स मिळवणं, सर्वांकडून कौतुकाची थाप मिळवणं म्हणजेच आयुष्य वाटत असतं. आपल्याला हवं तसं यश मिळत असतं, सर्वांकडून खूप प्रेम मिळत असतं आणि आयुष्य कसं  मजेत चाललेलं असतं, अगदी बागेत मुक्तपणे उडणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरासारखं!

      नंतर आपलं पदार्पण किशोर वयात होतं. शरीरातील हार्मोन्ससोबत आयुष्यातले रंगसुद्धा भराभर बदलू लागतात जणू ! गावात शिक्षणाची सोय नसेल तर नवीन शहरात जावं लागतं. नवीन कॉलेज, नवीन फ्रेंड्स, नवीन शिक्षक... पाटी पुन्हा नव्याने कोरी झालेली असते आणि त्या स्वप्नवत लाल-गुलाबी आयुष्याची नव्याने सुरवात होते. पण ऊर्जा आणि जोश असणाऱ्या केशरी रंगाचा ह्या वयात इतका जास्त प्रभाव असतो की सगळ्या गोष्टी कशा चटकन आत्मसात होतात. आई-वडिलांपासून दूर झाल्याचं वाईट जरी वाटत असलं तरी मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा आनंदही असतोच. शाळा कॉलेजचे दिवस खूपच अविस्मरणीय ठरतात. डिग्री मिळवणं हा एकच उद्देश असतो. मिळालेल्या संधीचे सोने करून आपलं भविष्य लख्ख सोनेरी करण्याचे वेधच लागतात जणू !

वर्षं सरतात; कॉलेज संपतं आणि आपले पंख त्या गर्द निळ्या आकाशाकडे झेप घेण्यास सज्ज झालेले असतात, अचानक आपण मोठे झाल्याची जाणीव होते पण आपल्या आईवडिलांसाठी अजूनही आपण लहानच असतो. परीक्षेचा पेपर जरी सर्वांसाठी सारखा असला तरी आयुष्याचा पेपर मात्र सर्वांसाठी वेगवेगळा असतो. काहीजण नापास होऊनही आनंदी जगू शकतात तर काही पास होऊनही बावरलेले असतात. करिअर घडवायचं असतं, जबाबदाऱ्या खुणावत असतात, आर्थिक-सामाजिक दडपण येतं आणि अश्यावेळी मात्र कोणत्याच रंगांचे ग्रह आपल्या बाजूने उभं राहायला तयार नसतात. संकट आली की चहुबाजुंनी घेरून टाकतात. वादळात अडकलेल्या पालापाचोळ्यासारखी अवस्था होते. पुढचा प्रवास आता धूसर आणि करड्या रंगासारखा रुक्ष वाटायला लागतो.काळ्याकुट्ट गर्द अंधारात दूरदूरपर्यंत कुणीच दिसत नसतं आणि अश्यावेळी जीव कसा गुदमरून जातो. असो ....

कधीकधी काही संकटातून बाहेर येण्यासाठी विशिष्ठ काळ लोटावाचं लागतो पण हा काळ खूप काही शिकवून जातो. बुडत्या नावेत सफर करायला कोणालाच आवडत नसतं आणि अश्यावेळी अगदी जवळची माणसंही सरड्यासारखी रंग बदलत जातात. अपयशाची लेबलं लागतात. आत्मविश्वासाच्या कश्या चिंधड्या उडतात. आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्यच चुकत जातं. सोडवताना वाटत गुंता सुटत गेला पण प्रत्येकवेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहित नसते आणि चालणाऱ्याचे मात्र ध्येय हरवून बसते. काही गोष्टी वाटतात तितक्या सोप्या नसतात आणि तेंव्हाच "अनुभव" म्हणजे काय हे कळून चुकतं.

नंतर सोनपावलांनी लग्नाचं वय येतं आणि खऱ्या अर्थाने आयुष्य रंगून जातं. आयुष्याच्या नव्या वळणावर नवी नाती भेटतात आणि आशेचा नवा किरण उगवतो. नववधू म्हणून मिरवत असताना सौभाग्यलंकार असणारा हिरवा चुडा, हिरवी साडी आपल्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करतात.  वसंत ऋतूसारखी सगळीकडे हिरवळ पसरते. सोनेरी मंगळसूत्र आपल्या सौंदर्यात अजूनच भर घालते. "मंगळसूत्र", मंगल म्हणजे पवित्र आणि सूत्र म्हणजे दोरा. तर ह्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचा वाईट दृष्टींपासुन संरक्षण करण्याचा हेतू असतो. जसे निसर्गाचे चक्र तसेच काहीसे आपले आयुष्यदेखील आहे असे मला नेहमी वाटते.  वादळ, सोसाट्याचा वारा, पाऊस थांबतो आणि त्यानंतर वातावरण कसं  शांत, प्रसन्न होऊन जाते. गढूळ पाणी पुन्हा एकदा निवळतं. नद्या संथ वाहू लागतात अगदी तशीच लग्नानंतर आपल्या आयुष्यात एक प्रकारची स्थिरता येते. जीवनाच्या वेलीवर सुंदर, रंगीबेरंगी फुलं बहरतात आणि पाखरांचा चिवचिवाट सुरु होतो. जेंव्हा आपण आई-बाबा होतो तेंव्हाही जबाबदाऱ्या असतातच पण आता त्यांचं ओझं वाटत नसतं. एकेकाळी संकटांच रूप धारण केलेल्या गोष्टी आता मात्र सोप्या वाटू लागतात आणि चंदेरी मुलामा चढवल्यासारखं आयुष्याचं रूपडंच बदलतं.

"ऋतू बदलतो, तसे दिवसही बदलतात, एकेकाळी निघून गेलेले आयुष्यात सहज परततात". विशेष म्हणजे आता आपण त्यांना अपयशी नसून सर्वगुणसंपन्न वाटतो. वेळ निघून जाते पण आठवणी नेहमी सोबत राहतात, आयुष्याच्या शिदोरीत अनुभवांचा ठेवा ठेऊन जातात. अश्याप्रकारे आयुष्यात परिस्थितीनुसार रंगही बदलतात आणि रंग बदलणारी माणसंही भेटत राहतात. कोणास ठाऊक काहीजणांचे सर्व रंग अजून उलघडलेही नसतील कदाचित! तरीही जीवन खूप सुंदर आहे, थोड्याफार फरकाने तुमचं आणि आमचं अगदी सेम आहे. शेवटी एवढ्या सुंदर आयुष्यासाठी देवाचे आभार मानुन पुढील आयुष्यात येणाऱ्या वादळांना  सामोरे जाण्याचं बळ दे आणि जीवनरूपी ही रांगोळी सदैव रंगीबेरंगी राहूदे एवढीच प्रार्थना करूयात.

जाता जाता मनात घर करून गेलेल्या हिंदी गाण्याच्या चार ओळी लिहिते आहे


 " तुफान को आना हैं, आकर चले जाना हैं  


   बादल हैं कुछ पल का, छा कर ढल जाना हैं 


   परछाईयाँ रह जाती, रह जाती निशाणी हैं                                                                                                  


   जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहाणी हैं "


                                                                                                                     - मंजुश्री खटकाळे जाधव 






Comments

Popular posts from this blog

रंग जीवनाचे ...